उपचारापेक्षा प्रतिबंध बरा – पशुधन लसीकरण करा
गोंदियातील पशुपालकांनी लसीकरणास सहकार्य करावे- पशुधन विकास अधिकारी डॉ. निलम वाव्हळ
गोंदिया 3: पशुसंवर्धन विभागास मान्सूनपुर्व लसीकरणासाठी घटसर्प, एकटांग्या, आंत्रविषार लसी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकारी डॉ.निलम वाव्हळ यांनी गोंदियातील पशुपालकांनी लसीकरणास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. प्रथम टप्प्यात हे लसीकरण नदीकाठची गावे किंवा पूरपिडीत क्षेत्रामध्ये होईल. त्यानंतर लसीच्या पुरवठ्यानुसार इतर भागात लसीकरण पुर्ण केले जाईल.
घटसर्प हा आजार पाश्युरेल्ला मल्टोसिडा नावाच्या जिवाणुने होतो. हा आजार गाई आणि म्हशीमध्ये पावसाळ्यात आढळतो. यात मरतुकीचे प्रमाण 80 टक्के आहे. हा जिवाणू आर्द्र आणि पाणी साठलेल्या ठिकाणावर जास्त काळ सक्रीय राहतो. उच्चताप, दुधाच्या उत्पन्नामध्ये अचानक घट, लाळ आणि नाकातून स्त्राव, घश्याला सुज, श्वास घेण्यास अडचण अशी लक्षणे दाखविल्यानंतर 1 ते 2 दिवसाच्या आत जनावराचा मृत्यू होतो. म्हशी सामान्यत: गाईपेक्षा जास्त संवेदनशील असतात. एकदा लक्षणे दिसल्यानंतर म्हशीचे बरे होण्याचे प्रमाण फारच कमी आहे.
प्रतिबंध करण्यासाठी आजारी जनावरांना वेगळे करा. चारापाणी वेगळे ठेवा. पावसाळ्यात जनावरांची गर्दी करु नका. ज्या भागात हा आजार आढळतो तेथे दरवर्षी 6 महिने व त्यापेक्षा जास्त वयाच्या जनावरांचे लसीकरण करा.
एकटांग्या या आजारामध्ये शरीराच्या मांसल भागात सुज येते. हा आजार म्हशींना सौम्य स्वरुपात आढळतो. दुषित चराऊ रान किंवा चारा यामुळे हा आजार होतो. 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील निरोगी जनावरामध्ये हा आजार आढळतो.
अचानक तीव्र ताप येणे, रवंथ करणे थांबविणे, मांसल भागात वेदनादायक सुज येते. जी गरम आणि दाबल्यास हवा भरल्यासारखी वाटते, 24 ते 28 तासात अशा लक्षणानंतर जनावराचा मृत्यू होतो. ज्या भागात हा आजार आढळतो तेथे पावसाळ्यापुर्वी दरवर्षी 6 महिने व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व जनावरांना लस दयावी. अशी जनावरे दगावल्यास खड्डयात पुरुन त्यावर चुनखडीचे मिश्रण शिंपडावे.
आंत्रविषार हा एक जीवघेणा आजार शेळ्या, मेंढ्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. हा सर्व वयोगटातील शेळ्या/मेंढ्यांवर परिणाम करतो. हा आजार लहान बकऱ्यामध्ये घातक असून ज्या शेळ्या/मेंढ्यांचे झपाट्याने वजन वाढते त्यामध्ये जास्त आढळून येतो. या आजारात भिन्न लक्षणे आढळतात. हिसके मारणे, टक लावून वर बघणे, दात एकमेकांवर घासणे, ताप, पोटाला सुज, रक्ताचा अतिसार येणे अशी लक्षणे आढळतात. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून सर्व पशुपालकांनी लसीकरणास सहकार्य करावे. असे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती गोंदिया यांनी कळविले आहे.