मुंबई विमानतळावर प्रवाशांना आता RT-PCR ची गरज नाही

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. सोमवारी राज्यात 15 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, तसेच मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली. अशात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रातून येणाऱ्या डोमेस्टिक प्रवाशांना RT-PCR टेस्ट मधून सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर आता RT-PCR टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. बीएमसीने सोमवारी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि एअरलाईन्सने प्रवाशांना RT-PCR टेस्ट करण्याची बळजबरी करु नये, असं बीएमसीने म्हटलंय. लवकरात लवकर कोरोनाचे निदान करण्यासाठी RT-PCR टेस्ट वापरली जाते. नवीन आदेश तत्काळ लागू होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून मुंबईत विमानाने जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पण, निर्बंधामध्ये शिथीलता आणण्यात आली आहे. 

याआधी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले होते. प्रवाशाचा 48 तासांच्या आता सॅम्पल घेण्यात येत होता. RT-PCR टेस्टशिवाय प्रवासाला बंदी होती. बीएमसीने विमानतळ प्राधिकरण आणि गो-एअर, इंडिगो, स्पाईसजेटसह एअरलाईन्सच्या सीईओंना नव्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधत कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं म्हटलं. राज्याचा रिकव्हरी रेट 92 टक्के झालाय. असे असले तरी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. शिवाय ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्याय येत आहे. पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथील करण्यात येत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Print Friendly, PDF & Email
Share