‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता व ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे वृत्त येत होते. आता पत्नी निशासोबत घरगुती हिंसाचार केल्याच्या आरोपाखाली करणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या करण गोरेगाव पोलीस ठाण्यात असून त्याचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, निशाने सोमवारी ३१ मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.
करण आणि निशा यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली असून त्यांना ४ वर्षाचा एक मुलगा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त वारंवार समोर येत होते.