दहावीची परीक्षा घेण्यासाठी उच्चन्यायालयात याचिकाकर्त्याला जीवे मारण्याची धमकी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेबाबत एकमताने परीक्षा न निर्णय घेण्यात आला होता. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर सरकारच्या या निर्णयावरून अनेक वाद समोर आले होते. काही जणांनी परीक्षा न घेतल्यानं मुलांच्या भविष्याचं नुकसान होत असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली होती.
पुण्यात राहणाऱ्या धनंजय कुलकर्णी नावाच्या व्यक्तीनं सरकारच्या या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करु नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू आहे. त्यानंतर याचिकाकर्ते धनंयज कुलकर्णी यांना धमकी देण्यात आली आहे.
धनंजय कुलकर्णी यांना सोशल मीडियावर दोन व्यक्तींनी धमकी दिली आहे. परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा घेण्याची मागणी करू नका. अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशी धमकी धनंजय कुलकर्णी यांना दिली गेली आहे. यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी कोथरूड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दहावीच्या मूल्यमापन संदर्भात जीआर काढला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.