गावरान जांभळांना उच्चांकी भाव
किरकोळ बाजारात 300-400 रुपये किलो भावाने विक्री
“तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका बसल्याने गुजरात येथून होणारी जांभळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक जांभळांना मागणी वाढली आहे. परिणामी, स्थानिक जांभळांना किरकोळ बाजारात उच्चांकी भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक किलो जांभळाची विक्री 300 ते 400 रुपये किलो भावाने केली जात आहे.
गुजरातमधील जांभळांची आवक पंधरा दिवसांपूर्वी बाजारात चांगली होत होती. चक्रीवादळाचा फटका जांभळांना बसला. त्यामुळे गुजरातमधून होणारी जांभळांची आवक पूर्णपणे थांबली. सध्या बाजारात कर्नाटक, तळकोकणातील सावंतवाडी, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा भागातून जांभळांची आवक होत आहे. गुजरातमधील जांभळांची आवक बंद झाल्याने स्थानिक जांभळांचे भाव तेजीत असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले.
यंदा गुजराती जांभळांचा हंगाम वेळेत सुरू झाला. बडोदा भागातून श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात दररोज आठ ते दहा टन जांभळांची आवक होत होती. दरम्यान, गावरानपेक्षा गुजराती जांभळे गोड असल्याने मागणी चांगली आहे. मधुमेहास जांभूळ उपयुक्त असल्याने गेल्या काही वर्षांपासून जांभळांना मागणी वाढली आहे.
करोनाच्या संसर्गामुळे प्रक्रिया उद्योग बंद आहेत. गेल्या वर्षी देशभरात टाळेबंदी होती. त्यामुळे गुजरातमधील जांभळाची आवक कमी झाली होती. येत्या काही दिवसांत पुन्हा गुजराती जांभळांची आवक सुरू होईल. पुढील दीड महिने गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू राहणार आहे. गावरान जांभूळ चवीला थोडे तुरट असते. गुजरातमधील जांभूळ चवीला गोड असते. त्यामुळे गुजरातमधील जांभळांना चांगली मागणी असते.