‘मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा’

रामदेव बाबांनी ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांना केले चॅलेंज

नवी दिल्ली – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्‍टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.

तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. आता, बाबा रामदेव यांनी अभिनेता आमीर खानलाही या वादात ओढून घेतलं आहे. त्यामुळे, हा वाद आणखीनच चर्चेचा विषय बनला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच  मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे.

शेअर केलेल्या व्हिडियोमध्ये  आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप या व्हिडिओत केला आहे. या व्हिडियोवरून त्यांनी  मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच  दिल आहे.

दरम्यान, आमचे रामदेवबाबांशी व्यक्‍तिगत शत्रुत्व नाही. त्यांनी ऍलोपॅथी आणि आधुनिक उपचार पद्धतीविषयीची आपली आक्षेपार्ह विधाने मागे घेतली तर त्यांच्या विरोधातील पोलीस तक्रारही आम्ही मागे घेऊ, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. जे. ए. जयलाल यांनी म्हटले आहे.

Share