फोनद्वारे मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी : बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरु


वृत्तसंस्था / मुंबई :
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे.
साधारणतः तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचे त्या फोनवरुन सांगण्यात आले होते, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचे पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. तसेच मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध घेत आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले .

Share