Breaking: अखेर दहावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला; अकरावी प्रवेशाबाबत सरकारने दिली माहिती

पुणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा फॉर्म्युला निश्‍चित केला असून तो जाहीर करण्यात आला आहे. जून अखेरपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येणार आहे. दरम्यान इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक स्वरुपाची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

याबाबतचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच जाहीर केला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यानुसार अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

दहावीच्या लेखी विविध लेखी परीक्षांसाठी 30 गुण, गृहपाठ ,तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा यांच्यासाठी 20 गुण व नववीच्या निकालावर आधारित 50 गुण याप्रमाणे विषय निहाय 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा निकाल समाधानकारक न वाटल्यास त्यांना श्रेणी सुधार परीक्षे अंतर्गत दोन संधी देण्यात येणार आहेत.

Share