साकोलीच्या नगराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हे

दबंग मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची तक्रार

साकोली, दि.२८ मे: अतिक्रमण काढण्यास मज्जाव करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याची तक्रार साकोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी साकोली पोलिसात दिल्याने पोलिसांनी साकोलीच्या नगराध्यक्षांसह नगरसेविका व अन्य १३ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत.

तक्रारीनुसार, साकोलीतील हरीश पोगळे यांनी नगर परिषद साकोलीच्या मालकीच्या पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या नाल्यावर एक मोठी खोली, संडास व बाथरूम इत्यादीचे अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे. मागील एक वर्षापासून त्यांना सदर नाल्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याकरिता नगर परिषदेने वारंवार नोटीस देण्यात आले. परंतु, त्यांनी अतिक्रमण काढले नव्हते. त्यामुळे २१ मे रोजी मुख्याधिकारी माधुरी मडावी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांसह अतिक्रमण काढण्यास गेले असता तिथे उपस्थित असलेल्यांनी अतिक्रमण काढण्यापासून मज्जाव केला. त्यानंतर ते मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर धावून गेले तसेच शिवीगाळ केली. दगड भिरकावून मारहाण करण्याची धमकी दिली.

जिल्हाधिकारी यांचे कलम ३७ (१)(३) महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये मनाई हुकुमाचे उल्लंघन केल्याने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नगराध्यक्षा धनवंता ईश्‍वरदत्त राऊत, नगरसेविका अनिता पोगळे, लता कापगते, डॉ. अजय तुमसरे, भोजेंद्र कापगते, हरिष पोगडे, चंद्रशेखर पोगळे, आदिनाथ नंदागवळी, अजय नंदागवळी, विनायक देशमुख, डॉ. अनिल मारवाडे, प्रीती डोंगरवार, प्रखर गुप्ता यांच्यावर भादंवि १४३, ३५३, ५0४, ५0६, १८६, ३३६, महाराष्ट्र पोलिस अधिनियमनाच्या १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सावंत करीत आहेत.

Share