स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शाळेतून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना अटक; 48 हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, दि.21 : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळा कुंभारटोली येथून 2 वेळा चोरी करणार्‍या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. ही कारवाई गुरुवार, 20 मे रोजी करण्यात आली. आरोपींमध्ये राजकुमार अभय कुमार (वय 30) रा. कुंभारटोली, आमगाव, सुरेश धनराज राऊत (वय 31), राजकुमार गोपीचंद मरकाम (वय 22) व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे.

सविस्तर असे की, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्ह्यातील मालमत्ता, चोरी, घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशाने 20 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासकीय व खासगी वाहनाने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान दरम्यान गोपनीय सूत्रांनी माहिती दिली की, कुंभारटोली येथील रहिवासी राजकुमार अभय कुमार याने आपल्या काही साथीदारासह जिप हायस्कूल रिसामा/कुंभारटोली (ता.आमगाव) येथील एलएफडी टीव्ही, कॅरम बोर्ड व इतर काही साहित्याची चोरी केली आहे. तसेच चोरीचे साहित्य त्याने स्वतःच्या धिती हॉटेलमध्ये लपवून ठेवले आहे.


या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाची टीम राजकुमार अभय कुमार यांच्या बंद असलेल्या धिती हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी आरोपी तेथे हजर होता. पोलीस टीमने त्या हॉटेलची झडती घेतली असता होटलच्या एका खोलीत एलएफडी टीव्ही, 2 लाकडी कॅरम बोर्ड, 1 संगणक मॉनिटर, 1 सीपीयू, 1 म्युझिक सिस्टम असा एकूण 48 हजर रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीची सदर मालाबाबत चौकशी केली असता त्याने ऑक्टोबर 2020 व मार्च 2021 मध्ये दोन वेळा रात्रीच्या वेळी सुरेश धनराज राऊत, राजकुमार गोपीचंद मरकाम व एका अल्पवयीन साथीदारासह सदर जिल्हा परिषद शाळेचा कुलूप तोडून चोरी केले व आपल्या धिती हॉटेलमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी राजकुमर अभय कुमार याच्यासह संपूर्ण चोरीचा माल ताब्यात घेतला. सदर दोन्ही गुणहयातील सहभागी आरोपींचा परिसरात शोध घेतला असता तेसुद्धा तेथेच जवळपास मिळून आल्याने त्यांनाही ताब्यात घेतले. सदर चारही आरोपींवर भादंविच्या कलम 461, 380 अन्वये गुन्हा आमगाव पोलीस ठाण्यात दाखल केला. 


सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नियंत्रणात पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार राजेश बढे, अर्जुन कावळे, पोलीस नाईक विठ्ठलप्रसाद ठाकरे, चेतन पटले, नेवालाल भेलावे, चालक पोलीस नाईक पंकज खरवडे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share