एसटी’चे स्टिअरिंग खासगी हातात देण्याची महामंडळाची तयारी?

नागपूर : अवघ्या महाराष्ट्राची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरीचेही स्टिअरिंग खासगी हातात सोपविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० बसेस खासगी वाहतूकदारांकडून भाडेतत्वावर घेणार असल्याचा सुगावा लागताच एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महामंडळाच्या विरोधात बंड पुकारण्याची तयार दर्शविली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या जवळपास १६ हजार प्रवासी बसेस तर, १ हजार ३०० माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत. आयुर्मान संपलेल्या अनेक बसेस दरवर्षी स्क्रॅप केल्या जातात. काही बसेस माल वाहतुकीसाठी वापरल्या जातील. यामुळे एसटी प्रवासी वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. हीच बाब समोर करीत खासगी बसेस भाडेतत्वावर घेऊन त्या चालविण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते. सध्या शिवनेरी, शिवशाही, व्होल्वो आदी गाड्या भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. महामंडळाने मोठा गाजावाजा करीत भाडेतत्त्वावरील शिवशाही बसेस सुरू केल्या होत्या. यात महामंडळाचे मोठे नुकसान झाले असून खासगी मालकांचा चांगलाच फायदा झाला आहे. त्याबाबत ओरड सुरू असतानाच एसटीच्या वाहतूक विभागाने ५०० गाड्याा भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. तो लवकरचा बोर्डसमोर मांडण्याची तयारीही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याबाबतचा निर्णय घेताना खासगी बसेस बसस्थानकापासून २०० मीटरपर्यंत पार्क करण्यात येऊ नये तसेच वाहतूक करू नये, या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळेझाक करण्यात आली आहे. खासगी वाहतूकदारांच्या फायद्यासाठी हा घाट घालण्यात आला असल्याचा कामगारांचा आरोप आहे. एसटी महामंडळाकडे स्वतःचे वर्कशॉप, बसस्थानक, पार्किंगची जागा आहे. स्वतःच्या बसेस बांधण्याची यंत्रणा व कामगारांना दीर्घ अनुभव आहे. यानंतरही खासगी व्यक्तींच्या हितासाठीच या घडामोडी सुरू आहे. ही मंडळी महामंडळाच्या संसाधनांचा उपयोग करीत आपले उखळ पांढरे करून घेतील असा आरोपही त्यांनी केला आहे.

खासगी वाहतूकदारांकडून प्रवासी वाहतुकीसाठी बसेस घेण्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा तीव्र विरोध दर्शविला आहे. भाडे तत्त्वावर गाड्या घेतल्यास संघटना रस्त्यावर येईल असा इशारा संघटनेचे प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय अध्यक्ष प्रज्ञाकर चंदनखेडे, विभागीय सचिव पुरूषोत्तम इंगोले यांनी दिला आहे. 

खासगी भाडे तत्त्वावरील शिवशाही बसेस चालवून महामंडळाचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. त्यापुढे खासगी बसेस चालविण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा एस टी कामगार रस्त्यावर उतरतील.

-अजय हटटेवार, प्रादेशिक सचिव, एस.टी. कामगार संघटना.

Share