अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त, गुन्हा दाखल
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथून अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त करून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची कारवाई काल १९ मे रोजी करण्यात आली.
दुर्गापूर येथे बोगस शासन प्रतिबंधित एच.टी.बी.टी.कापूस बियाणे विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता त्यानुसार सदर ठिकाणी आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जंगले यांच्या मदतीने जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, मोहीम अधिकारी के.जी.दोनाडकर, कृषी अधिकारी चामोर्शी वसंत वळवी यांनी छापा टाकून बोगस बियाणे विक्री करत असलेल्या राहत्या घरून एकूण १०४ कापूस पॅकेट जप्ती केले व संबंधित विक्रेत्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांच्या लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन आष्टी येथे काल रात्री.१०.१० वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाद्वारे जिल्ह्यात कापूस घेण्यात येणाऱ्या पट्टयात कृषी केंद्राच्या तसेच संशयित गोदामांच्या ठिकाणी तपासण्या सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे एच.टी.बी.टी. बियाणे लागवड करू नये, शासन मान्यताप्राप्त वाणांचीच लागवड करावी असे आव्हान कृषी विभागाने केले आहेत.