मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच रेमडेसिविर या इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. वाढत्या मागणीमुळे आणि पुरवठा कमी होत असल्याने इंजेक्शनच्या काळाबाजाराला सुरुवात झाली. अवघ्या 1200 रुपये किंमत असणारं हे इंजेक्शन 20 हजारांपासून 1 लाखांपर्यंत विकलं गेलं.

रेमडेसिविर हे इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नसल्याचं समोर आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना उपचारातून वगळण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर देखिल इंजेक्‍शनचा कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसून न आल्याने जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना उपचारासाठी रेमडेसिविरचा वापर करू नये, असं सांगितलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनावरील उपचारासाठी रेमडेसिविर या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बनावट रेमडेसिविर बनवल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. रॉयटर या वृत्तसंस्थेने जागतिक आरोग्य संघटनेला लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, प्रिक्वालिफिकेशन लिस्टमधून रेमडेसिविर हे इंजेक्शन वगळण्यात आलं आहे. तसेच जे देश जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतात, त्या देशांना रेमडेसिविर घेण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटना करत नाही.

रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णावर प्रभावी असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नसल्याने कोरोना उपचारातून रेमडेसिविर हे इंजेक्शन वगळण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्यामुळे आता रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रूग्णांना देण्यात येऊ नये असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share