तरुणांनो तयारीला लागा, पोलीस भरतीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य
नागपूर | महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया अनेक महिन्यांपासून रखडली आहे. मात्र आता पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय. याबाबतही लवकरच निर्णय जाहीर करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. यावर माध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीबाबतही भाष्य केलं. तसेच पंतप्रधान मोदींबद्दल मुंबईत झालेली पोस्टरबाजी, मोदींनी गुजरातला केलेली मदत, मराठा आरक्षण, तौत्के चक्रीवादळात झालेलं नुकसान यावरही दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
तोत्के चक्रीवादळात गुजरातसह कोकणालाही मोठा फटका बसलाय. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटीच्या मदतीची घोषणा केलीय. पण महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नाही. केंद्राने गुजरातला मदत केली याबद्दल तक्रार असण्याचे काही कारण नाही. मात्र, त्यासोबत महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी, असं वळसे-पाटील म्हणाले.
मुंबईतील घाटकोपरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलीय. याबाबत विचारले असता पंतप्रधानाबद्दल झालेली पोस्टरबाजी हा पोलीस आयुक्तांच्या पातळीवरचा विषय, त्याबाबत मी वाच्यता करणे योग्य नाही, असंही वळसे पाटलांनी म्हटलंय.