‘विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही’, परीक्षा रद्दच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. SSC,ICSC, CBSE बोर्डाने यंदाही दहावीची परीक्षा रद्द केलीय. हा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. पुणे येथिल प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांचं भविष्य आणि करिअर आपण अशाप्रकारे खराब करु शकत नाही. राज्यातील शिक्षण धोरणकारांना हे माहिती असायला हवं. हे मुळीच मान्य होऊ शकत नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. तसंच 10 वी परीक्षेबाबत दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सर्व बोर्डांना प्रश्न विचारलेत. तुम्ही विद्यार्थ्यांना कसं पास करणार आहात? त्यांना गुण कसे देणार आहात? या विद्यार्थ्यांची आतापर्यंत एकही परीक्षा झालेली नाही. पहिली ते आठवीची परीक्षा घेतली जात नाही. गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीचीही परीक्षा घेतली नाही. त्यानंतर आता 10 वीची परीक्षाही रद्द करण्यात आली. मग या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने पास करणार आहात? असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा शिक्षण विभाग आणि बोर्डांना विचारला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचे प्रश्न उपस्थित
तुम्ही 12वीची परीक्षा घेता मग तुम्ही 10 वीची परीक्षा का घेत नाहीत? असा प्रश्नही मुंबई उच्च न्यायालयाने विचारलाय. त्याचबरोबर सर्व बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिक्षण तज्ज्ञांशी बोलून प्रतिज्ञापत्र सादर करावं, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश देताना सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केलीय. प्रत्येक वर्षी आपण विद्यार्थ्यांना प्रमोट करु शकत नाहीत. आपण शैक्षणिक दृष्ट्या मुलांचं नुकसान करु शकत नाहीत, असंही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.
न्यायालयाचे परीक्षामंडळाला परखड प्रश्न
- >> 12वी परीक्षा घेता येतात तर 10वी परीक्षा का नाही ?
- >> महाराष्ट्राची 10वी परीक्षा न घेऊन शैक्षणिक भाविष्य का खराब करता ?
- >> अंतर्गत परीक्षा न झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना फुगवट्याच्या गुणांच्या आधारे विद्यार्थी कसे उत्तीर्ण करणार?
- >> 10वी परीक्षा न घेता विद्यार्थी पुढील अभ्यासक्रमास कसे प्रवेश देणार ?
- >> महाराष्ट्र शासनाने 10वी परीक्षा रद्दचा कोणताही गांभिर्याने विचार केलेला नाही असे का ?
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 20 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.