आता म्युकरमायकोसिससाठी साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोनाशी लढत असतानाच त्यातून उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशीसारख्या नव्या आजारानी मेडिकल जगतासमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. देशातल्या वाढत्या केसेस पाहता आरोग्य मंत्रालयाने या आजारासाठीही साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे.
कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराचाही आता साथीचे रोग नियंत्रण कायद्यात समावेश होणार आहे. देशात म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराचे संख्य वेगाने वाढू लागल्यानं केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम आता याही आजारासाठी लागू होतील. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने आज सर्व राज्य सरकारांना याबाबतचा आदेश जारी केला आहे.

म्युकरमायकोसिससाठीही आता साथ नियंत्रण कायदा लागू 

साथीचे रोग नियंत्रण कायदा ( 1897) अंतर्गत आता म्युकरमायकोसिस हा लक्षणीय आजार म्हणून समावेश होणार आहे.
सर्व राज्य सरकारं, खासगी हॉस्पिटल्स यांना आजाराच्या चाचणीबाबत, उपचाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरने दिलेल्या गाईडलाईन्स बंधनकारक राहणार आहे.
सर्व संशयित, आजारी रुग्णांच्या केसेस केद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणे बंधनकारक असेल.
एपिडेमिक ॲक्ट लागू झाल्यानंतर केंद्राला अंमलबजावणीसाठी विशेष अधिकार प्राप्त होतात. कायदा लागू करण्यासाठी नियम आखणाऱ्या सरकारांना कोर्टातल्या अपीलांपासूनही संरक्षण मिळते.
ब्रिटीशांनी प्लेगच्या साथीत आणलेला हा कायदा कोविडपाठोपाठ आता म्युकरमायकोसिससाठीही लागू होत आहे.
देशात गेल्या महिनाभरात या रुग्णांची संख्या काही हजारांत पोहचली आहे. एकट्या महाराष्ट्रातच या आजाराचे 800 ते 850 रुग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले होते.
वाढती संख्या पाहता राज्याला 2 लाख इंजेक्शनची गरज आहे. पण काही कारणामुळे ही इंजेक्शन मिळायलाही 31 मे ची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस महत्वाचे…या आजाराबाबत आरोग्यमंत्र्यांच्या बोलण्यात जो इशारा आहे तो महत्वाचा आहे. आज केंद्रानं उचललेल्या पावलातही तेच गांभीर्य दिसतंय.
म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा आजार कोविडच्या उपचारात स्टेरॉईडचा अतिवापर केल्यानं होतो असं सांगितलं जातंय.सुरुवात नाकापासून होते आणि नंतर मेंदूपर्यंत हे इन्फेक्शन पोहचते .
कोरोनाशी लढतानाच आता म्युकरमायकोसिस सारख्या नव्या आजारांची आव्हानं समोर येत आहेत. त्यामुळे याबाबत वेळीच खबरदारी घेणं आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share