रोहित पवारांचा भाजपाला टोला; म्हणाले – ‘गडकरींनी सांगून देखील राजकारण न करण्याची हौस फिटत नाही’

मुंबई : – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका पत्रावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सडकून टीका केली आहे. भाजपचे नेते फक्त राजकारणासाठी चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात, हे दुर्दैवी असल्याचे म्हणत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगून देखील राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस फिटत नाही, असा जोरदार टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

फडणवीस यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्या पत्रात राज्यात आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचा आणि राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा दावा केला होता. या पत्रावरूनच रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले नितिन गडकरी करोनाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडं जाऊन काम करताना दिसतात, किंबहुना ‘आजच्या करोनाच्या परिस्थितीत राजकारण करू नका,’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांची एका कार्यक्रमात कानउघाडणीही केली. परंतु, तरीही चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याची आणि राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही. असे रोहित पवार म्हणाले आहेत.

पुढे रोहित पवार म्हणाले, आज महाराष्ट्रातील अनेक प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबतही त्यांनी एखादं पत्र केंद्र सरकारला लिहिलं तर राज्यातील जनता निश्चितच त्यांचं स्वागत करेल, इथले विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली. सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट आणि प्राणवायू पुरवठ्याची स्तुती केलीय. परंतु, तरीही राज्यातील भाजपाचे नेते फक्त राजकारणासाठी या सर्व चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Share