१ लाख ७४ हजारांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त : आरमोरी पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकून १ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केल्याची कारवाई काल १८ मे २०२१ रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार काल १८ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विनायक आबासाहेब जुआरे व त्यांचा मुलगा रुपम यांनी ताडुरवार नगर, आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयलगत असलेल्या शिवपार्वती मंदिराजवळ हिराबाई देवीकार यांची खोली भाड्याने घेतली असून त्या खोलीचा वापर मजा, ईगल प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यासाठी गोडावून म्हणून वापरत असून सदरचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ हे त्यांचे मालकीचे सद्गुरू किराणा दुकान जुना बस स्टॉप जवळ आरमोरी येथील दुकानातून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचासह सदर गोडाऊनची पाहणी केली असता ती कुलूप बंद असल्याने त्यांच्या चाव्या घेऊन या असा निरोप आरमोरी पोलीस ठाण्याचे अधिकारी सपोनि चव्हाण व अंमलदार यांनी त्यांच्या दुकानातील रूपम जुआरे यास समक्ष दिला असता रूपम व त्यांची बहीण नेहा यांनी सदर गोडाऊनच्या चाव्या देण्यास नकार देऊन अरेरावी भाषा वापरून शिवीगाळ करून व सपोनी चव्हाण यांचे अंगावर धावून येऊन त्यांना मोबाईल ने मारण्याचा प्रयत्न केला. सपोनि चव्हाण हे शासकीय कामात कामकाज करीत असताना त्यांचे शासकीय कामकाजात अडथळा आणला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कलम 353, 34 भारतीय दंड संहिता प्रमाणे तसेच ताडुवार नगर येथील उपजिल्हा रुग्णालय लगत असलेल्या हिराबाई देविकार यांचेकडून भाड्याने घेतलेल्या कुलूप बंद खोली गोडाऊन मध्ये मजा किंमत १ लाख ६६ हजार १००, ईगल हुक्का तंबाखू किंमत ५ हजार ४००, प्लास्टिक पन्नी किंमत २ हजार ८०० असा एकूण १ लाख ७४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने भा.दं .वि.272,273,188 प्रमाणे आरमोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास महिला पोलीस उप निरीक्षक कांचन उईके ह्या करीत आहेत.

Share