वनातील आगीत होरपडलेल्या ‘त्या’ कामगाराचा मृत्यू; तपासही थंडबस्त्यात

वनातील आगीत होरपडलेल्या ‘त्या’ कामगाराचा मृत्यू; तपासही थंडबस्त्यात

गोंदिया, दि.19 : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या नागझिरा आणि पिटेझरीच्या कंपार्टमेंट क्रमांक 97, 98, 99 व 100 मध्ये 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली होती. ही आग विजविण्याचे कार्य करताना 5 कामगार गंभीररित्या होरपडले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जखमी कामगारांवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावरील उपचारांचा खर्च सरकारकडून दिला जात होता. 17 मे रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान या मजुरांपैकी थाटेझरी येथील रहिवासी विजय तिजाब मरसकोल्हे (वय 42) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत 3 वन मजुरांचा मृत्यू झाल्यावर सरकार, वन्यजीव विभाग आणि स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली होती. तीच मदत विजय तिजाब मरसकोल्हे रा. थाटेझरी यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. 

संरक्षित वनात कशी लागली आग? तपास थंडबस्त्यात 

संरक्षित वनक्षेत्रात आग कशी लागली, कोणी लावली, याचा खुलासा अद्याप होऊ शकला नाही. अज्ञात व्यक्तिद्वारे लावण्यात आलेल्या आगीचा तपास वन्यजीव विभागाने आतापर्यंत केलेला नाही. तसेच या प्रकरणात दोषी अधिकारी कोण आहे, याबाबत न चौकशी झाली ना कारवाई. उपचारादरम्यान थाटेझरी येथील मजुराचा मृत्यू झाल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण होवू नये व कोणतीही अनुचित घटना घडू न्ये यासाठी वन विभागाने पोलीस विभागाला विनंती करून सुरक्षा दल तैनात केले. या घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Share