‘कलम 188’ संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा भविष्यात अडचणीचा ठरणार !
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडले असाल आणि आपल्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण या गुन्ह्यात आपल्याला अटक जरी झाली नसेल तरी भविष्यात पासपोर्ट आणि सरकारी नोकरीत हे गुन्हे अडचण ठरण्याची शक्यता आहे.
संचारबंदीचे उल्लंघन करणे कलम 188, साथरोगाचा प्रसार करून इतरांचा जीव धोक्यात घालणे कलम 269 आणि कलम 270 नुसार जर आपल्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याचे गंभीर परिणामही नागरिकांना भोगावे लागू शकतात. शासनाने ठरवले तरी हे गुन्हे सहजासहजी परत घेतले जाऊ शकत नाहीत.
या गुन्हाचे काय परिणाम होऊ शकतात?
- पासपोर्ट मिळवताना अडचणी येण्याची शक्यता.
- व्हिसा देखील नाकारला जाऊ शकतो.
- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अडचण येईल.
- खासगी बँकेत नोकरी मिळवताना अडचण येईल .
- शिवाय काही खाजगी कंपन्या देखील आता पोलिसांचं क्लिअरन्स मागतात त्यातही अडचण निर्माण होईल.
महाराष्ट्रात गतवर्षी कोविड कालावधीत लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात 2 लाख 70 हजार नागरिकांवर पोलिसांनी नोंदवलेले कलम 188 चे सर्व गुन्हे मागे घेण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यांच्या घोषणेनंतर कोणतेही आदेश गृहमंत्रालयांकडून पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. परिणामी हे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभरात भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत सुमारे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचबरोबर 1 हजार 347 वाहन मालकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. लॉकडाउन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांना 28 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याचबरोबर 37 हजार 42 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, 96 हजार 340 वाहने जप्त करण्यात आली होती. लॉकडाऊन काळात पोलिसांवर हल्ला करण्याची 364 प्रकरणे घडली होती. या प्रकरणी 895 जणांना अटक झाली असून, पुढील न्यायालयीन कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे मंडळी विनाकारण घराबाहेर पडताना सावधान जर आपल्यावर असे गुन्हे दाखल झाले तर आयुष्यभर मनस्ताप करावा लागेल. जरी शासनाने ठरवलं हे गुन्हे मागे घ्यायचे तरी हे गुन्हे मागे घ्यायचे की नाही याचा सर्वस्वी अधिकार न्यायालयाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला गंभीरतेने घ्या घराबाहेर पडू नका.