सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष


वृत्तसंस्था / मुंबई :
“तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली तसेच विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही हे पाहण्याच्याही सूचना दिल्या.
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.


रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

Share