ही वेळ टिका करण्याची नव्हे तर संकटाशी लढण्याची : प्रफुल पटेल

औषधसाठा, ऑक्सिजनची समस्या नाही

गोंदिया 15: कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णावाढ झाली. मात्र या संकटाचा सामना जिल्ह्यातील यंत्रणेने सक्षम केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडच्या परिस्थितीत आता सुधारणा झाली आहे. या संकटाचा सामना करीत असताना यंत्रणेच्या काही त्रुटी आणि चुका राहिल्या असतील मात्र ही चुका काढण्याची किंवा टिका करण्याची वेळ नाही. तर आलेल्या संकटाशी सर्वांनी मिळून लढण्याची वेळ असून कोविडच्या लढ्यात यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
खा. प्रफुल्ल पटेल हे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कोविडचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. खा. पटेल म्हणाले जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. ऑक्सिजन, औषधे आणि बेडची सुध्दा समस्या नाही. जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटर मध्ये पुन्हा १०० ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्यात येतील. तसेच देवरी, आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारण्यात येणार आहे. तर गोंदिया येथे पुन्हा एक ऑक्सिजन सिलिंडर रिफिलींग प्लांट उभारण्यात येणार आहे. तर स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून मी वेळाेवेळी प्रशासनाच्या संपर्कात असून रोज परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. यावेळी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहषराम कोरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, नगरसेवक विनित शहारे उपस्थित होते .


मेडिकलमध्ये लवकरच नवीन सीटी स्कॅन मशिन

कोरोनामुळे सीटी स्कॅन करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील एकाच मशिनवरील ताण वाढला असून येत्या १५ दिवसात आणखी नवीन सीटी स्कॅन मशिन लावण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी सुध्दा उपलब्ध आहे. मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच सुरु होणार असून २०२३ पर्यंत मेडिकलची सुसज्य इमारत तयार होईल असा विश्वास खा. पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.


अदानी प्रकल्पाकडून ५० जम्बो ऑक्सीजन सिलिंडर सुपूर्द

अदानी विद्युत प्रकल्पाने कोरोना संकटात जिल्ह्याला बरीच मदत केली असून १३ केएलच्या ऑक्सिजन टँकनंतर आता ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सुध्दा उपलब्ध करुन दिले. या ऑक्सिजन सिलिंडरचे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच आणखी ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.


रब्बीतील धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ

खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदी सुरु झाली नाही. तर यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत गेली आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थती लक्षात घेता रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक दर्शविली आहे. तसेच रब्बीतील धान खरेदी सुध्दाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच धानाच्या भरडाईचा सुध्दा तिढा सुटला असून उघड्यावरील धानाची प्राधान्याने उचली केली जाणार असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले.


धानाचा बोनस लवकरच

कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. सकारच्या तिजोरीत सुध्दा ठणठणाट आहे. मात्र संकट काळात राज्य शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या बोनसची रक्कम येत्या १५ दिवसात दिली जाईल. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुध्दा चर्चा केली असून त्यांनी सुध्दा सकारात्मकता दाखविली असल्याचे खा. प्रफुल्लट पटेल यांनी सांगितले.

Share