लॉकडाऊन वाढल्यामुळे व्यापारी ठाकरे सरकाविरोधात आक्रमक; तोडगा न काढल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

मुंबई: ठाकरे सरकारने लॉकडाऊनला 31 मेपर्यंत मुदतवाढ दिल्याने आता राज्यातील व्यापारी आक्रमक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाईन विक्रीची मुभा आहे. याउलट दुकाने बंद होत असल्यामुळे पारंपरिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सरकारने तात्काळ तोडगा न काढल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ई-कॉमर्स कंपन्या कायद्याची पायमल्ली करत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वस्तुंची ऑनलाईन विक्री सुरु आहे. अशाप्रकारे कायद्याची पायमल्ली होत असताना सरकार गप्प का? नियम हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, असे विरेन शहा यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

’40 दिवस व्यापार बंद होते , व्यापाऱ्यांचे 50000 कोटी बुडालेत, आता महाराष्ट्र अनलॉक कराच’

गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनविरोधात आता व्यापारी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकारने काहीही करून महाराष्ट्र अनलॉक केलाच पाहिजे, अशी मागणी विरेन शाह यांनी बुधवारी केली होती.

गेल्या 40 दिवसांपासून दुकाने बंद आहेत. या काळात राज्य सरकारला आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. 40 दिवसांमध्ये व्यापाऱ्यांचे तब्बल 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. ठाकरे सरकारच्या ‘मुंबई मॉडेल’ची देशभरात चर्चा होते. आता राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सगळं काही अनलॉक केलंच पाहिजे, असा युक्तिवाद शाह यांनी केला होता. मात्र, त्यानंतरही राज्य सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Print Friendly, PDF & Email
Share