“शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

मुंबई : ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी आणि आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.

सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे. ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. नितेश राणे यांनी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.

करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे,  आगामी अधिवेशनात मी हे सर्व पुरावे मांडून सर्वांना उघडं पाडणार आहे. कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आलेत, किती बिलं झालेत, हे सर्व मला माहिती आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही जास्त रक्कम मिळते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

Share