अजित पवारांना सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी 6 कोटीची मंजुरी
वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे मोर्चा वळवला आहे. अजित पवार यांच्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय स्तरावरील समाज माध्यमांचा या कामासाठी बाह्य संस्थेची निवड करण्यास प्रशासनानं मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, युट्युब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमातून चांगली प्रतिमा तयार होण्यासाठी वर्षाला तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्याची तजवीज महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या चांगल्या प्रतिमेसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये सोशल मीडियावर तांत्रिक कौशल्य असणारे व्यावसायिक नाहीत. त्यामुळे बाह्य संस्थांकडून अधिक प्रभावीपणे काम व्हावं, यासाठी प्रशासनानं मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख निर्णय उपक्रम, शासकीय योजना, धोरण, ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं. राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क साधता यावा यासाठी ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ब्लॉग, वेबसाईट आदी समाज माध्यमातील प्लॅटफॉर्मवर योग्य इमेज उंचावण्याचं काम करण्यात येणार आहे.
वित्त विभागानं यासाठी वार्षिक 5 कोटी 98 लाख रुपयांची तजवीज देखील केली आहे. यापूर्वी अजित पवार प्रसारमाध्यमांपासून दोन हात दूर राहिले आहेत. आता सध्याच्या काळात समाज माध्यमांमध्ये पवार हे देखील इतरांप्रमाणेच प्रतिमा सुधारण्याचं काम करू पाहात आहेत, अर्थात शासकीय खर्चातून हे काम केलं जाणार असल्यानं यावर विरोधक टीका देखील सुरू करत आहेत.
दरम्यान, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही स्वतःची समाज माध्यमांवर प्रतिमा उंचवण्यासाठी शासकीय कोट्यातून करोडो रुपये खर्च करणार आहे.