चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 111 रुग्ण

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एकाच दिवसात तब्बल 2 जणांचा या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे.

म्युकरमायकोसिस या आजाराचे आता मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये तब्बल 111 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सर्व रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईबाहेरचे असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण आता नागरिकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनानंतर या नव्या संकटाने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये या आजाराने सुरूवातीला प्रवेश केला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात शिरकाव केला आणि आता मुंबईमध्ये 111 रुग्ण आढळल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.  डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरू होते.  दरम्यान, अमरावती जिल्ह्यातही या गंभीर आजाराचे 10 रुग्ण आढळले असून त्यांच्यावरदेखिल रूग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर इलाज मोफत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या रुग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे.

डोंबिवलीमध्ये 69 वर्षीय बाजीराव काटकर तसेच 38 वर्षीय तुकाराम भोईर यांचा म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसी आरोग्य विभागाच्या मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

Share