?मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करा: जिल्हाधिकारी मीना


? मान्सून पुर्वतयारी आढावा सभा


गोंदिया,दि.10 : मान्सून कालावधीत अचानक उदभवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरीता सर्व विभागांनी मान्सून पुर्वतयारीचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पुर्वतयारी आढावा बैठक 10 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री मीना म्हणाले, 1 जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्व विभागांनी नैसर्गीक आपत्तीचे पुर्व नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 87 गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्य साठा, औषध साठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सोयीस्कर होईल. नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नाली सफाईचे काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजाराची साथ होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतूकीकरण करण्यात यावे. पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज अद्यावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
जलसंपदा व महसूल विभाग यांनी योग्य समन्वय ठेवून काम करावे. जिल्ह्यातील रस्ते, जलाशये, जीर्ण इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या इमारतीची मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तपासणी करुन वापरण्यास योग्य असल्यास तसा अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धरण, जलाशये, तलाव तसेच धोक्याच्या ठिकाणी कुणीही सेल्फी घेतांना किंवा गर्दी करतांना आढळल्यास त्यांच्याविरुध्द योग्य ती कार्यवाही करावी.


श्री मीना पुढे म्हणाले, पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील तालुका, नगरपरिषद, नगरपंचायत, प्रभाग, वार्ड आणि ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करावी. जेणेकरुन पूर परिस्थितीत ग्राम पातळीपर्यंत समन्वय साधला जाऊ शकेल तसेच पूर परिस्थितीत जिवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता यांना धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी सर्व संबंधितांना सूचना देण्याबाबत, पोलीस विभागाला पाण्याखाली बुडालेले रस्ते, पुल या ठिकाणी बॅरीकेटींग लावून बंदोबस्त करण्याबाबत, पुरवठा विभागाला पूर प्रवण गावात धान्याचा साठा उपलब्ध करण्याबाबत, विद्युत विभागाला मान्सून पुर्व विद्युत तारांवर झाडांच्या खांद्या कापणे, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह यांना धोक्याचे ठिकाणात रेडीयमचे फलक लावण्याबाबत, आरोग्य विभागाला सर्व आरोग्य केंद्रात औषधांचा पर्याप्त साठा उपलब्ध ठेवण्याबाबत निर्देशही श्री मीना यांनी दिले.


सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

Print Friendly, PDF & Email
Share