देशभरात 1 लाख बनावट रेमडेसिवीर विकले, पोलीस तपासात आणखीही अनेक धक्कादायक खुलासे

वृत्तसंस्था अहमदाबाद : सध्या देशभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अशा गंभीर परिस्थितीत देशातील नागरिक हा लढा देत असताना काही लोक नागरिकांच्या गरजेचा फायदा घेत असल्याचं चित्र समोर येत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच रेमडेसिविर हे इंजेक्शन संपूर्ण देशातच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचं समोर आलं.

रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. गुजरातमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. तब्बल 1 लाख बनावट रेमडेसिविर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण तपासामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

सुरतच्या एका टोळीला बनावट रेमडेसिविर बनवून विकण्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर आरोपींनी या संदर्भात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. ग्लुकोज आणि मीठ एकत्र करून मिश्रण बनवून त्याला रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटलीमध्ये भरून दलालांच्या मदतीने 35 ते 40 हजार रुपयांना विकत असल्याचं उघड झालं आहे.

मुंबईमध्ये भंगारातील इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या विकत घेऊन मुंबईतच रेमडेसिविरचे बनावट स्टिकर बनवून गुजरातच्या मोरबी येथील फार्महाऊसवर फक्त 80 रुपयात एक इंजेक्शन बनवून ते 35 ते 40 हजार रुपयांना विकले जात होते. संबंधित प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 17 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी 12 आरोपींविरोधात रासुका अंतर्गत कारवाई सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी 1 लाख इंजेक्शन बनवले पण त्या सर्व इंजेक्शनचा बॅच नंबर हा एकच होता. त्यामुळे हा प्रकार उघडकीस येऊ शकला. परंतु तब्बल 1 लाख बनावट इंजेक्शन आतापर्यंत त्यांनी संपूर्ण भारतातील विविध भागांमध्ये विकले असल्याने अनेकांचा जीव त्यांच्यामुळे धोक्यात आला आहे.

Share