कोरोना विषाणूच्या निर्मितीसाठी चीनचा सुरू होता सहा वर्षांपासून प्लॅन? : ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने केला दावा


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. ही महामारी येण्यामागे काय कारणं आहेत याचा शोध सतत आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतला जात आहे. हा विषाणू अचानक 2020 मध्ये आला असे नसून चीनमधील शास्रज्ञ 2015 सालापासून सार्स विषाणूच्या मदतीने जैविक अस्र तयार करण्यासाठी प्रयत्नशील होते. चीनच्या सैन्याने 6 वर्षांपूर्वीच कोविड-19 विषाणूला जैविक अस्र म्हणून वापरण्याची योजना तयार केली होती, असा दावा ऑस्ट्रेलियातील ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने केला आहे. चीनमधील एका रिसर्च पेपरच्या आधारे हे वृत्त दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दैनिक भास्करच्या वेबसाईटवर यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
या बातमीनुसार चीनी शास्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी 2015 पासूनच कोविडच्या वेगवेगळ्या स्ट्रेनबाबत चर्चा करत होते. त्यावेळी चीन शास्रज्ञांनी म्हटलं होतं की तिसरं महायुद्ध झालं तर त्यात जैविक अस्र म्हणून या विषाणूचा वापर करता येईल. तसंच गरज पडली तर या विषाणूच्या रचनेत बदल करून जगात महामारी परसवण्यासाठीही त्याचा उपयोग करता येईल. या शास्रज्ञांच्या चर्चेसंबंधी हाती लागलेल्या पुराव्यांतून ही बाब उघड झाली आहे.


जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनमधील या विषाणूबाबत चौकशी किंवा तपास करण्याची मागणी करण्यात आली तेव्हा तेव्हा चीनने माघार घेतल्याचं या बातमीत म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियातील सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट रॉबर्ट पॉटर म्हणाले, ‘ चीनने थेअरी मांडली होती की वटवाघुळांच्या मार्केटमधून कोरोना विषाणू जगभर परसरला पण ही थेअरी पूर्णपणे खोटी आहे. मी चिनी रिसर्च पेपर्सचा सखोल अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो रिसर्च पेपर अगदी बरोबर आहे. आम्ही सतत चिनी रिसर्च पेपरचा अभ्यास करतो त्यातून चिनी संशोधक काय विचार करत आहेत याचा अंदाज आम्हाला येतो.’
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राने केलेला हा दावा खोटा म्हणता येणार नाही कारण गेल्यावर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे कोरोना विषाणूला चिनी व्हायरस म्हटलं होतं. हा विषाणू चिनी प्रयगोशाळांत तयार झाला असून त्यामुळे जगातील हेल्थ सेक्टरचं मोठं नुकसान झालं असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्या आहेत. अमेरिकी गुप्तचर संस्थांकडे चिनच्या व्हायरसचे पुरावे असून वेळ आल्यावर ते जगासमोर मांडले जातील असा दावा ट्रम्प यांनी केला होता.
ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सार्वजनिकपणे आपली भूमिका मांडलेली नाही. ब्लूमबर्गने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीत अमेरिका या विषयात अतिशय गंभीर आणि गतिमान चौकशी करत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे हा दावा सत्य असू शकतो.
काल जगभरात 7.83 लाख नवे रुग्ण सापडले आणि 13 हजार 22 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोना रुग्ण भारत आणि ब्राझीलमध्ये सापडत आहेत. शनिवारी जगात एकूण झालेल्या मृत्युंपैकी 47 टक्के भारत आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत. शनिवारी भारतात 4 हजार 133 आणि ब्राझीलमध्ये 2 हजार 091 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जगात 15.83 कोटी जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यापैकी 32.96 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर 13.66 कोटी लोक बरे झाले आहेत.

Share