फडणवीसांनी मराठा समाजाची फसवणूक केली- नाना पटोले
मुंबई ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान मोदींना अपयश आल्याची टीकाही त्यांनी केली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, विरोधी पक्ष व केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीला न मिळणारे सहकार्य आणि काँग्रेस ची ताकद वाढवण्यासाठी स्वबळाची केली जाणारी भाषा यासह अनेक विषयांवर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली.
नाना पटोले म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असतांना सगळेच पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत, त्यात काही वावगे नाही, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू हे वारंवार सांगत आलो आहे. सर्वच पक्षांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देखील तशी तयारी सुरू केली तर त्यात वावगे काही नाही. मला माझा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे केवळ दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होत नसतो हे लक्षात घेतले पाहिजे.
देशातील अनेक राज्यात आज कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी सुरुवातीलाच पत्र लिहून केंद्राला काही सूचना केल्या होत्या. मात्र केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. अनेक देशांनी कोरोनाचे गांभीर्य वेळीच ओळखले. भारतालाही ते करता आलं असंत पण सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा आपल्याला भोवला, अशी टीकाही पटोले यांनी केली.
कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देखील केंद्राचे धोरण चुकले. देशात कोरोनाचे रुग्ण लाखोंच्या संख्येत वाढत असतांना आधी आपल्या नागरिकांना लस देणे गरजेचे होते. पण आपण लसी परदेशात पाठवल्या. ज्या लस आक्टोंबर महिन्यात वाटायला हव्या होत्या. त्या अजूनही प्रलंबितच आहेत. लस वेळीच मिळाल्या असत्या तर नक्कीच आज वेगळे चित्र असते असा दावाही पटोले यांनी केला.
केंद्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे हे त्यांच्या पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक विधानातून स्पष्ट केले आहे. त्यांनी थेट देशाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे. कोविड परिस्थित राजकारण झाल नाही पाहिजे, ही आमची भूमिका आहे. माञ विरोधी पक्ष नेते फक्त राजकारण करत आहेत, जनतेलाही आता हे कळालं आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
मराठा आरक्षणा संदर्भातील लढा अद्याप संपलेला नाही, आम्ही प्रयत्न सोडलेले नाही असे स्पष्ट करतांनाच मराठा आरक्षणात गायकवाड समितीला मराठा कसे मागास वर्गीय आहेत ते दाखवण्यात फडणवीस कमी पडले, अशी टीकाही पटोले यांनी केली. मराठा समाजाला फसवण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे.
वेळ पडल्यास महाविकास आघाडीचे नेते मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांची भेट घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस फक्त सत्तेसाठी धडपडत आहेत. त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही,सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत असेही पटोले म्हणाले. विश्व गुरूचं स्वप्न पाहणाऱ्या मोदींवर देशभरातून टीका होते आहे, माञ ते आमचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे वाईट वाटतं, असेही पटोले म्हणाले.