“कोरोनाच्या चितेत लोक जळत होते, तेव्हा पंतप्रधान प्रचारात मग्न होते”
मुंबई :महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना परिस्थिती बिकट बनत चालली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. “भाजपला 24 तास फक्त सत्ता पाहिजे, देशात कोरोनाच्या चितेमध्ये लोक जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारात लागले होते”, अशा प्रकारची टीका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली.
“देशातील अनेक कुटुंब रस्त्यावर आले, अनेक लोक बरबाद होत होते. पण पंतप्रधानांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसतच नाही, त्याला कोण काय करणार”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी यावेळी लगावला. जनतेचे प्रश्न समजून घेऊन काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकार काम करतंय असंही यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
“जनतेचे प्रश्न जे आहे ते प्रश्न घेऊन आम्ही काम करतोय, सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही काम करतोय”, अशा प्रकारच्या भावना नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या आहेत.