राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरचा पुरवठा १० दिवसांत सुरळीत होणार : राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात कोरोना लसीसह विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा तुटवडा भासत आहे. तसेच रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणात उघड झालेला आहे. अशावेळी राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुढील 10 दिवसात नीट केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. त्याला काही कंपन्यांनी पुरवठा दिला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्स्टेंटरचाही पुरवठा योग्य केला जाईल, असेही पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्याची चर्चा सुरु झाली आहे. अशावेळी केंद्राने लॉकडाऊन लावला तर देर आये दुरुस्त आहे. आम्ही आधी लावला तर त्याला विरोध करण्यात आला. आता त्यामुळेच रुग्णसंख्या कमी होत आहे, असेही पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. अभिनेत्री कंगना रानौतचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले. कंगनाचे ट्विटर ब्लॉक केले ते योग्यच केले. कुणीही काहीही बोलावे हे योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ओळखावी. जेवढ्या मर्यादा असतील तेवढेच बोलावे. कोणत्या पक्षाची बाजू घेऊन बोलू नये, असा सल्लाही पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी केला.