राज्यात उद्यापासून शाळांना सुट्टी

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या दिनांक 1 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यातील शाळांचे शैक्षणिक सत्र संपुष्टात येणार आहेत.

राज्यात यावर्षी नेहमीचे शैक्षणिक सत्र 13 जूनला सुरू झाल्यानंतर करोना च्या पार्श्वभूमीवरती पाचवी ते बारावीची शाळा महाविद्यालय नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आली होती .करोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्या शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा संपूर्ण वर्षभर सुरू होऊ शकलेल्या नाहीत .असे असले तरी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या ऑनलाइन स्वरूपामध्ये, गृहभेटी कार्यपुस्तिका यासारख्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांची जोडून शैक्षणिक प्रक्रिया सुरू करण्यात राज्य शासनाला काही प्रमाणात यश आले होते.

राज्यातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेच्या आधारे व अंतर्गत मूल्यांकनाच्या निकषावर ती विद्यार्थ्यांची मूल्यांकनाची प्रक्रिया यापूर्वीच घोषित करण्यात आली आहे. राज्यातील दहावीच्या परीक्षा देखील करोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती राज्यातील शिक्षक संघटनांनी शैक्षणिक वर्ष संपुष्टात आणून उन्हाळी सुट्टी देण्यासंदर्भात शासनाला निवेदन केले होते. याची दखल घेऊन राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार 1 मे पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पुढील शैक्षणिक वर्ष 14 जूनला सुरू होणार असून विदर्भातील तापमानाचा अंदाज घेऊन 28 जून रोजी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल. उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी समायोजन संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने देण्यात येईल. माध्यमिक संहितेच्या आधारे एकूण शैक्षणिक वर्षाच्या एकूण 76 सुट्ट्या होतील. याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा सध्या बंद असल्या तरी सन 21_ 22 या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू करण्यासंदर्भात covid-19 प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले आहे.

Share