मंत्री विजय वडेट्टीवारांचे संकेत, ‘1 मे नंतरही राज्यात Lockdown वाढवण्याची शक्यता?’
पुणे – राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने 1 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र आता राज्यातील कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता 1 मे नंतरही लॉकडाऊन वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या बुधवारी (दि. 28) कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान 1 मे नंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार का असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यात ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत पाटील यांनी दिले आहे. तसेच केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोफत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकास आघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाचा निर्णय घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.