आधी रक्तदान करा मग कोरोनाची लस घ्या- मंत्री विजय वडेट्टीवार

कोरोना लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस रक्तदान करता येणार म्हणून आधी रक्तदान करा मग कोरोनाची लस घ्या


वृत्तसंस्था / मुंबई :
मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती आणखीच बिकट आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला हरवण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण होणे आवश्यक आहे. अशा स्थितीत 1 मे पासून राज्यात 18 वर्षांवरील लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यानंतर एक वेगळीच चिंता देशाला सतावत आहे. कोरोना लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात राज्याला रक्त टंचाईचा सामना करावा लागू शकतो.
याचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. 1 मे पासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू होणार आहे. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वजणांना लस घेता येणार आहे. पण लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवस आपणास रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात रक्त टंचाई टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावं, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.


वडेट्टीवार पुढं असंही म्हणाले की, सध्या रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. अशातच कोरोना लस घेतल्यानंतर पुढील 60 दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share