तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या सहा दुकानांवर कारवाई

गडचिरोली : कोरोनाचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी भामरागड नगर पंचायत व मुक्तिपथने आज २३ एप्रिल रोजी संयुक्त मोहीम राबवित शहरातील ९ दुकानांची तपासणी केली. दरम्यान सहा दुकानांमध्ये एकूण १२ हजार २३४ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ व प्लॉस्टिक पिशव्या आढळून आल्या. याप्रकरणी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता राज्यासह जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच भामरागड नगरपंचायत व मुक्तीपथने शहरात मोहीम राबवित एकूण ९ किराणा दुकानांची तपासणी केली.
दरम्यान सहा दुकानांतून विनोद तंबाखू, सुंदरी बिडी, बैलजोडी तंबाखू, ठवकर तंबाखू, स्वामी नस, खर्रा पन्नी, नेवला तंबाखू , राजश्री, विविध प्रकारचे सिगारेट, प्लॉस्टिक पिशव्या, सुरत बिडी, सुगंधित तंबाखूचे लहान मोठे ८ पॉकेट असा एकूण १२ हजार २३४ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच यापुढे दुकानात तंबाखूजन्य पदार्थ, प्लास्टिक पिशव्या, कॅरीबॅग यांची साठवणूक किंवा विक्री करताना आढळून आल्यास दुकान सील करण्यात येईल अशी समज दुकानदारांना देण्यात आली.


सदर कारवाई नप मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नप चे लेखापाल नीलकंठ फुसे, मुक्तिपथचे आबिद शेख, नप कर्मचारी मनीष मडावी, रवी गुडीपाका, जितेंद्र मडावी, महेंद्र कुसराम, नरेश मडावी, राजेंद्र पिपरे यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share