पुन्हा नक्षलवाद्यांनी केले पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण, सुरक्षा दलात खळबळ
प्रहार टाईम्स
वृत्तसंस्था / छत्तीसगड : मधील बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. माओवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बिजापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरिक्षक मुरली ताती असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. जगदलपूरला नियुक्तीवर असलेले मुरली ताती हे सुट्टीवर बिजापूर जिल्ह्यात गंगलुरला आपल्या गावी आले होते.
पालनारच्या आठवडी बाजारात खरेदी करण्यासाठी गेले असता बाजारातून माओवाद्यानी पोलीस उपनिरीक्षकांचे अपहरण केले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अलीकडेच 3 एप्रिल रोजी माओवाद्यांनी जवानाचे अपहरण करुन नाटयमय पद्धतीने सुटका केली होती. त्या घटनेनंतर आज उपनिरीक्षकांचे अपहरण केल्याने सुरक्षा दलात खळबळ उडाली आहे.
बिजापूरमध्ये माओवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह मनहास यांची माओवाद्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती. 7 एप्रिल रोजी राकेश्वर सिंह मनहास यांचा एक फोटो समोर आला होता. हा फोटो माओवाद्यांनी जारी केला होता. त्याशिवाय सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह अद्याप जिवंत असल्याचा दावा केला होता.
कोब्रा जवान राकेश्वर मनहार 6 दिवसांनंतंर माओवाद्याच्या तावडीतून सुटले होते. सरकारने गठण केलेल्या दोन सदस्यीय मध्यस्ती टीमचे सदस्य पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैयासह शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत माओवाद्यांनी जवानाची सुटका केली होती.