होळी साजरी करण्यावर निर्बंध, जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी
यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
भुपेन्द्र मस्के/प्रहार टाईम्स
गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मृत्यूदराचा दर कमी झाला असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र जास्त आहे. या पार्श्वभूमी गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे.
यानुसार सार्वजनिकरित्या होळी सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांचेकडुन परिपत्रक जारी
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना यांनी दिला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
व्यापारांचे नुकसान होण्याची शक्यता
त्यामुळे यंदाही कोरोनापूर्वी साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीवर निर्बंध येणार आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. या निर्बंधामुळे अनेक दुकानात शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या 2 लाख 40 हजारचेवर रुग्णावर उपचार सुरु आहेत.