Lockdown ची शक्यता?? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये करोना पुन्हा थैमान घालत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असून, इतर राज्यातील परिस्थितीही चिंताजनक होताना दिसत आहे. प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह इतर राज्यात केंद्रीय पथकं पाठवली असून, आज पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वार ही बैठक होणार असून, बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे..

महाराष्ट्रासह देशातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतर मंगळवारी (१६ मार्च) राज्यात १७ हजार रुग्ण आढळून आले. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे देशातील आकडाही झपाट्याने वाढू लागला आहे. इतर राज्यातही करोनाचा उद्रेक होत असल्यानं पंतप्रधानांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे होणाऱ्या बैठकीत करोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राज्यात काही कडक निर्बंध करण्यासंदर्भातही पंतप्रधानांकडून सूचना केल्या जाऊ शकतात.

देशातील विविध राज्यात संसर्ग वाढू लागल्यानंतर रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल २८ हजार ९०३ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ हजार ७४१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याच कालावधीत देशात १८८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

Share