जिल्हा बँकेची आघाडी, राष्ट्रीयीकृत बँकांची कासवगती; शेतकरी चिंतेत
गोंदिया : आगामी खरीप हंगाम अवघा महिनाभरावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणाची गती अद्यापही संथ आहे. १५ मेपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्याला यंदाच्या आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेल्या एकूण उद्दिष्टापैकी ३५.१० टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२९ कोटी ११ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, खासगी बँकांची कासवगती कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याला २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४९५ कोटी ३२ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले.
१५ मेपर्यंत जिल्ह्यातील १३,३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्यक्ष कर्ज पोहोचले आहे. यंदा खरीप पीककर्ज वितरणात नवीन कर्जदारांपेक्षा जुन्यांच्या नूतनीकरणावर भर देण्यात आल्याचे दिसत आहे. बँकांनी १५ मेपर्यंत केलेल्या एकूण वितरणापैकी जुन्या कर्ज खात्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत १२८१०६ शेतकऱ्यांना २०६ कोटी, ग्रामीण बँकेने १२२४ शेतकऱ्यांना ९ कोटी ८४ लाख व राष्ट्रीयीकृत बँकांनी ११३९ शेतकऱ्यांना १२ कोटी ३९ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बँकेने ५५.६६ टक्के, ग्रामीण बँकेने १७.५० टक्के, राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ५.९० टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना जिल्हा बँक वगळता ग्रामीण आणि राष्ट्रीयीकृत बँकांची पीककर्ज वाटपाची स्थिती गंभीर आहे.






