“मै भी कॉकरोच” म्हणत ग्रामपंचायत सदस्याचे जि.प.मध्ये भीक मागो आंदोलन

दोन वर्षांपासून मनरेगा मजुरी थकीत; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोखे आंदोलन

गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया येथे गुरुवारी एका ग्रामपंचायत सदस्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत “मै भी कॉकरोच”चे पोस्टर हातात घेत भीक मागो आंदोलन केले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमगाव तालुक्यातील पिपरटोला येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील गिरडकर यांनी हे आंदोलन केले. गावात मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची मजुरी मागील दोन वर्षांपासून थकीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित मजुरांना अद्याप मेहनताना मिळाला नसल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

थकीत मजुरी मिळावी यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत गिरडकर यांनी संतप्त भूमिका घेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

“मै हू कॉकरोच पार्टी” असे लिहिलेले पोस्टर घेऊन ते जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले आणि भीक मागत प्रशासनाचा निषेध नोंदविला. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या “मै भी कॉकरोच” ट्रेंडचा आधार घेत करण्यात आलेल्या या आंदोलनाची जिल्हाभरात चर्चा रंगली आहे.

“मागील दोन वर्षांपासून मनरेगा मजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे मजुरांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हे आंदोलन केले.”
— सुनील गिरडकर, ग्रामपंचायत
सदस्य

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें