नाना पटोले विधानसभा अध्यक्ष: साकोली to मुंबई Via दिल्ली

व्यक्ति विशेष: नाना भाऊ पटोले

नाना पटोले यांची अखेर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्ष आणि दहा उपाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या टीममध्ये कोणाचा समावेश?

सहा कार्यकारी अध्यक्ष

शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली आहे.

दहा उपाध्यक्ष

शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे, कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, एम एम शेख, माणिक मोतीराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.

काँग्रेसची नवी टीम, संपूर्ण यादी
टीम काँग्रेस, मराठवाडा
बसवराज पाटील – कार्यकारी अध्यक्ष
कैलास गोरंट्याल – उपाध्यक्ष
एम एम शेख – उपाध्यक्ष
टीम काँग्रेस, उत्तर महाराष्ट्र
कुणाल पाटील – कार्यकारी अध्यक्ष
शिरीष चौधरी – उपाध्यक्ष
शरद आहेर – उपाध्यक्ष
टीम काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्र
प्रणिती शिंदे – कार्यकारी अध्यक्ष
मोहन जोशी – उपाध्यक्ष
रमेश बागवे – उपाध्यक्ष
टीम काँग्रेस, विदर्भ
शिवाजीराव मोघे – कार्यकारी अध्यक्ष
रणजीत कांबळे – उपाध्यक्ष
टीम काँग्रेस, कोकण
हुसेन दलवाई – उपाध्यक्ष
माणिकराव जगताप – उपाध्यक्ष
टीम काँग्रेस, मुंबई
मोहम्मद आरिफ नसीम खान – कार्यकारी अध्यक्ष
चंद्रकांत हांडोरे – कार्यकारी अध्यक्ष

काँग्रेसला एक क्रमांकाचा पक्ष करणार : नाना पटोले


काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करणार असल्याचा निर्धार नाना पटोले यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “जिल्हा पातळीवर काही बदल करु. गटातटाचं राजकारण करणार नाही. पक्षात कोणीही नाराज नाही. मी जंस काम केलं तसं कोण करणार, असं इतरांना वाटतं हा माझा सन्मान आहे.”

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष पदी कोण? 

नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.

संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात.त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.

सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते. अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे . मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली होती. काल 4 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलांसारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि ते ‘जायंट किलर’ ठरले.

मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले.

नाना पटोलेंच्या या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता’
नाना पटोले आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. मात्र भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.
“शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता, अशी नाना पटोलेंची ओळख आहे,” असं मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण व्यक्त करतात.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

चव्हाण यांनी म्हटलं, “नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील.”
तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं, की नाना पटोले 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, तर एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तसंच अनेक वर्षांपासून त्यांना सभागृहातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

आक्रमक आणि अनुभवी नेतृत्व
नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखलं जातं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष प्रचारात कुठेही दिसत नाही, अशी चर्चा सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी नाना पटोलेंनी महापर्दाफाश यात्रा काढली होती.
या यात्रेदरम्यान त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली होती.
“भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत,” असं त्यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आले.
तेव्हा त्यांनी म्हटलं, “महाराष्ट्र विधानसभेची देशभरात वेगळी प्रतिष्ठा राहिली आहे. ती कायम ठेवण्याची मी प्रयत्न करेन. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाला कधीकधी आक्रमक व्हावं लागतं. वेळेनुसार आक्रमकता वापरली जाईल.”

दलितांचा विरोध?
2019च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंना काँग्रेसकडून नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पटोलेंच्या नावाची चर्चा होत असतानाच नागपूरच्या काही आंबेडकरवादी संघटनांनी त्यांना तिकीट न देण्याची मागणी राहुल गांधींकडे केली.
2006 साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबातील चार लोकांची कुणबी समाजातील काही लोकांनी हत्या केली होती. त्यावेळी कुणबी समाजाच्या आरोपींच्या समर्थनात नाना पटोलेंनी जाहीर भूमिका घेतली होती त्यावरून त्यांना विरोध झाला होता.
बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही स्पष्ट केलं होतं, की कुठल्याही परिस्थितीत ते पटोलेंना पाठिंबा देणार नाही. “त्यांची खैरलांजी प्रकरणातली भूमिका संशयास्पद होती. ते आरोपींच्या पाठीशी उभे राहिले म्हणून पटोलेंना तिकीट देणं काँग्रेससाठी धोक्याचं ठरेल,” असंही त्यांनी म्हटलं होतं.
यावर पटोले यांनी ‘हफिंगटन पोस्ट’शी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. “मी जातीयवादी नाही. मी त्यावेळी आरोपींना संरक्षण दिलं असतं तर लोकांनी तेव्हाच माझी राजकारणातून हकालपट्टी केली असती. नागपुरातून मला तिकीट मिळतंय म्हणून विरोधकांनीच शिजवलेला हा कट आहे.”

लोकसभेत पराभव, विधानसभेत विजय
2019च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून निवडणूक लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली.

या लढतीत काँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा पराभव केला. 2009 मध्ये नाना पटोले याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तर 2014मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. चार वर्षांनंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये परतले.

Print Friendly, PDF & Email
Share