
राज्यातील विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयांमध्येच मिळणार
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास थेट त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटीच्या कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज आता भासणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम १६ जूनपासून राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत, शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नावे असलेली यादी एसटी विभागाला दिल्यानंतर, एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन पात्र विद्यार्थ्यांना पास देणार आहेत.
यापूर्वीपासूनच विद्यार्थी किंवा त्यांचे पालक एसटी आगार कार्यालयांमध्ये जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा शाळांमधून संपूर्ण गटाने एकत्रित जाऊन प्रक्रिया पूर्ण केली जायची. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जात असे आणि पालकांचेही श्रम खर्ची पडत असत. आता ही धावपळ पूर्णतः थांबणार आहे.
या मोहिमेअंतर्गत पास वितरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना विद्यार्थ्यांची अद्ययावत यादी तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे १६ जूनपासूनपासून सुरु होणारी पास वितरण प्रक्रिया अडथळाविना पार पडेल.
विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास पास –
एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पासासाठी ६६.६६ टक्के सवलत दिली जाते, ज्यामुळे त्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरावे लागते. तसेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी प्रवास पास पूर्णपणे मोफत देण्यात येतो. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण आणि निमशहरी भागांतील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
महत्त्वाचे मुद्दे –
उपक्रमाचे नाव : एसटी पास थेट तुमच्या शाळेत, सुरुवात : १६ जून २०२५ पासून, लाभार्थी : राज्यातील लाखो शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सवलत : सर्व विद्यार्थ्यांना ६६.६६% सवलत, विद्यार्थिनींसाठी बारावीपर्यंत मोफत पास, शाळांना सूचना : पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याचे आदेश.