
आवास प्लस योजनेत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल
गोंदिया: व्यक्तीला स्वतःचे घर असावे, यासाठी शासनाद्वारे विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आवास प्लस योजनेच्या सर्वेक्षणादरम्यान १ लाख २१ हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. निश्चित मुदतीच्या आत नोंदणी पूर्ण करण्यात जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. शासनातर्फे विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहे. असे असतानाही घरकूल योजनेसाठीपात्र असूनही अनेक गरजूंना घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन आवास प्लस योजनेसाठी सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले.
यातंर्गत गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे या सर्वेक्षणादरम्यान एकही लाभार्थी घरकूल योजनेपासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्यात आली. सर्वेक्षणाचा प्रथम टप्पा १५ मेपर्यंत होता. या टप्प्यात ८९ हजार ५३६ घरकूल लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. या टप्पयातही जिल्ह्यातील अनेक पात्र असलेले लाभार्थी घरकुलापासून वंचित राहिल्याने सर्वेक्षणाचा अवधी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला. वाढवलेल्या अवधीत २९ हजार ५७७ लाभार्थ्यांनी घरकुलासाठी नोंदणी केली. तसेच या कालावधीत ग्रामपंचायत अधिकार्यांमार्फत गृहभेटीतंर्गत ९१ हजार ९७९ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात योजनेंतर्गत सर्वेक्षण व गृहभेटीमुळे जिल्ह्यात घरकूल लाभार्थी नोंदणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून निर्धारित वेळेत नोंदणी करण्यात जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे