
निराधार बालकांनाही मिळणार आधार कार्ड
गोंदिया: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साथी मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती सर्व्हे करून विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षाखालील निराधार बालकांना आधार कार्ड काढून देणार आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहिम राबवणार असून यामध्ये ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख व इतर सेवा मिळणार आहे.
मोहिम बालहित सर्वोपरी या तत्त्वावर आधारित असून बालकांचे सर्वांगीण पुनर्वसन आणि विकास हे मुख्य उद्देश आहे. अशा सर्व मुलांचे २६ जून २०२५ पर्यंत सर्वेक्षण करून त्यांना २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत आधार नोंदणीव्दारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. सोबतच या मुलांना शैक्षणिक, आरोग्य निवारा, सामाजिक समावेश तसेच कायदेशीर संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
समिती जिल्ह्यातील निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार आहे. त्यामधे विधी सेवा यंत्रणा, स्थानिक प्रशासन, तहसीलदार, पोलिस, आरोग्य, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था, बालकल्याण समित्या, विधिज्ञ, विधी स्वयंसेवक, शैल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी, बाल संरक्षण अधिकारी, पोलिस अधिकारी, बालगृह, निवारागृह, अनाथाश्रम आदी शासकीय-अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींचा समावेश असुन सर्व सदस्य एकत्रितपणे काम करणार आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. के. वाळके समितीचे समन्वयक आहेत.