
ओवारा परिसरात वाघाची हालचाल, वन विभाग सतर्क
देवरी: तालुक्यातील ओवारा परिसरात काल (ता. १०) रात्री ८:०० ते ८:३० च्या सुमारास वाघ दिसल्याचा दावा प्रकाश यादव रा. तेढा यांनी केला आहे.
सतत आठ दिवसापासून पुन्हा ओवारा शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर इसम दुचाकी वरून पिपरटोला या गावाकडून ओवाराकडे येत असताना, त्यांना अंदाजे २०० फूट अंतरावरून वाघ रस्ता ओलांडताना असल्याचे दिसले. सदर इसमाने यांची खबर ओवारा गावातील लोकांना दिली. मात्र, तोपर्यंत वाघ धरणाच्या कडेला असलेल्या दाट झाडीत गायब झाला.
वाघ ओवारा गावाच्या दिशेने आला असून, पुढे धरणाच्या कडेला जाऊन दिसेनासा झाल्याचे सांगितले. यापूर्वी याच वाघाने सावली गावातील मुकेश परिहार यांच्या गाईची शिकार दि.०२ जून ला केली होती. त्यानंतर दि.०४ जून ला शिवचरण लिल्हारे रा.सावली च्या शेतात दिसून आला. अशी परिसरात चर्चा आहे.
सावली, डोंगरगाव तसेच ओवारा या तीन गावांमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर वनविभागाने तातडीने दखल घेऊन या वाघाचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
ओवारा, सावली, डोंगरगाव या जंगल परिसरामध्ये वाघाच्या वावर असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकटे न फिरता टोळक्याने फिरावे. शेतातील कामे लवकर आटोपून घरी लवकर परत यावे. सायंकाळ होताच नागरिकांनी शक्यतो बाहेर फिरणे टाळावे. जंगलात गुरे ढोरे चारायला नेताना सतर्कता बाळगावी. वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सचिन धात्रज वनपरिक्षेत्र अधिकारी देवरी यांनी केले आहे.