
सारस पक्षी गणनेत सहभागी होण्याचे आवाहन
गोंदिया: वनपरिक्षेत्रात सोमवार 16 जून रोजी सकाळी 5 ते 9 या वेळेत वार्षिक सारस पक्षी गणना करण्यात येणार आहे. इच्छुक स्वयसेवी संस्था, स्वयंसेवक, यंत्रणा व पक्षीप्रेमींनी गणनेत सहभागी होण्यासाठी 14 जूनपर्यंत त्यांची नावे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गोंदिया येथे नोंदवावी, असे आवाहन गोंदिया वन परिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी केले आहे.
दशकभरपुर्वी बहुसंख्येने आढळणारे सारस पक्ष्यांची संख्या कमालीने रोडावली आहे. या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासन व वन विभागाने पावले उचलली आहेत. गतवर्षी झालेल्या सारस पक्षी गणनेत जिल्हयात 28 सारस पक्ष्यांची नोंद झाली होती. पैकी 26 सारस गोंदिया वनपरिक्षेत्रात आढळले होते. सारस गणना पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धतीने केली जाते. त्यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येचा अंदाज विश्वासार्ह असतो. विशेष म्हणजे, सारस पक्षी आता फक्त महाराष्ट्र राज्यात आणि तेही गोंदिया, भंडारा जिल्ह्यातच पहावयास मिळतात. शिवाय मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात त्यांचे अस्तित्व आहे. 16 जून रोजी सकाळी 5 वाजता क्षेत्रातील जवळपास 25 स्थळांवर गोंदिया वनपरित्राधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी, वनमजूर, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, पक्षी मित्र, शेतकरी यांच्या उपस्थितीत सारस पक्षी गणना करण्यात येणार आहे. गणनेदरम्यान योग्य आणि विश्वासार्ह निष्कर्ष समोर येतील आणि सारस संवर्धनाचा मार्ग सुकर आणि खात्रीचा होईल. सारस पक्षी गणनेनंतर उपलब्ध आकडेवारीही जाहीर केली जाईल.Stork birdत्यामुळे दुर्मिळ सारस पक्ष्याची सद्यस्थिती आणि त्यांची योग्य संख्या यांचे अचूक विश्लेषण केले जाईल. उल्लेखनीय म्हणजे, सारस पक्ष्यांच्या घटत्या संख्येवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करीत सारसांच्या संवर्धन व संरक्षणासाठी उपाय योजन्याचे निर्देश शासनाला दिले होते. यानंतर वन विभाग, सेवा संस्था, सारस पक्षी प्रेमी आणि शासनाने प्रेमाचे प्रतीक असलेल्या सारस पक्षाच्या संवर्धनाकरिता पावले उचलली.
गोंदिया वन विभाग, सेवाभावी संस्था, शेतकरी, पक्षी मित्रांच्या सहकार्याने सारस पक्षी संवर्धनाचे कार्य सुरू आहे. सारस पक्ष्यांची इतंभू संख्या माहित व्हावी, त्यांचे अस्तित्व आणि संवर्धनासाठी उपाययोजना करता याव्यात यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या पंधरवाडयात सारस पक्षी गणना केली जाते. स्वयंसेवी संस्था, पक्षी प्रेमी, शेतकर्यांनी सारस गणनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन गोंदियाचे वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक यांनी केले आहे.