पोलिस भरती २०२१ पहिल्या टप्प्यात 5,300 पदे भरणार – अनिल देशमुख

प्रहार टाईम्स: पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात ७ हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा आरक्षणामुळे या भरती प्रक्रियेला उशीर झाला. अखेर भरतीचा मार्ग खुला झालेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात पहिल्या टप्पयात पाच हजार ३०० जणांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलिस भरती पाठोपाठ डॉक्टर भरतीही होणार आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्यात एक लाख घरे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी काही दिवसात राज्यात ११२ हे आपतकालीन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या क्रमांकावर सर्वसामान्य नागरिकांना लवकर मदत मिळावी. यासाठी पोलिस विभाग दोन हजार चारचाकी वाहन आणि अडीच हजार दुचाकी वाहन ‘जीपीआरएस’ तंत्रज्ञानासह विकत घेणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मदत मिळावी. यासाठीही याचा उपयोग होणार आहे. ही योजना आगामी काही महिन्यात लागू केली जाणार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

राज्यात पीडित महिलेच्या मदतीसाठी मनोधैर्य ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत विविध प्रकारच्या घटनांसाठी विविध मदत देण्यात येत असते. या योजनेच्या लाभासाठी न्यायिक प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, या योजनेतंर्गत पीडित महिलेला लवकर मदत मिळावी. यासाठी प्रक्रियेत बदल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत पीडितेला मदत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांच्याकडून मिळावी. यासाठी बाल विकास विभागाकडून परिपत्रक काढण्यात येणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share