लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deori: अडीच वर्षांपूर्वी क्रांती झाली आणि त्यावेळची ठिणगी आता ज्वालामुखीसारखी सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे शिवसेनेत येणाऱ्यांची रीघ लागली आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा जो-तो शिवसेनेत येऊ लागला आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असो अथवा नाही, पदे येतात पदे जातात, पण राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली, याचा अभिमान आहे. तेव्हा विश्वास देतो, कुणी काहीही सांगितले, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

देवरी येथे शुक्रवार २१ फेबुवारी रोजी काँग्रेसचे माजी आमदार सहषराम कोरोटे यांचा शिवसेना पक्षप्रवेश व शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री संजय राठोड, आ. नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहषराम कोरोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू उपस्थित होते.

    शिंदे म्हणाले, काल एका बातमीत एसटी प्रवासात दिलेली ५० टक्के सवलत बंद होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, एसटीत दिलेली ५० टक्के सवलत असो किंवा ज्येष्ठांसाठी सुरू केलेली योजना, कधीच बंद होणार नाही. लेक लाडकी लखपती, लाडकी बहीण योजना किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रातील ज्या योजना सुरू केल्या, त्यादेखील सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. २०२२ मध्ये उठाव केला, संघर्ष केला. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या मनातले सरकार स्थापन केले. आम्ही अनेक योजना आणल्या, बंद पडलेले प्रकल्प, विदर्भ- मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प सुरू केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते १९ मध्ये जलयुक्त शिवार योजना सुरू केली. मात्र, महाविकास आघाडीने ती बंद केली.

    शेतकऱ्यांच्या, माता- भगिनींच्या सर्व योजना आघाडी काळात बंद झाल्या. मोठमोठे प्रकल्प बंद झाले. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अनेक विकास कामे आम्ही केली. तुमच्या नावात राम आहे. मात्र, तुम्ही यायला उशीर केला. तुम्ही आधीच आला असता, तर चित्र वेगळे असते. पण, असू देत आता तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

    Share