
भरधाव ट्रेलर सुरक्षा भिंत तोडून, घुसला शिरपूर ग्रामपंचायत कार्यालयात
नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर बांध गावातील घटना
देवरी : महाराष्ट्र छत्तीसगड राज्य सिमेलगत असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील शिरपूर/बांध गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाची सुरक्षा भिंत तोडून भरधाव ट्रेलर घुसल्याची घटना आज दि.१६ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी ४:०० वाजे दरम्यान घडली आहे. सुदैवाने जीवित हानी टळली असून, ट्रेलरचालक सुखरूप आहे. प्राप्त माहितीनुसार रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील महाराष्ट्र छत्तीसगड सिमेलगत असलेल्या, देवरी तालुक्यातील ग्राम शिरपूर बांध येते ट्रेलर क्र. सी.जी.०७ ए.ई.६७८६ नागपूर कडून रायपुर कडे रेल्वेच्या सामान लादून भरधाव वेगाने महामार्गाने जात होता.परंतु, अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, ट्रेलरने यु टर्न घेत रस्त्याच्या कडेला असलेली शिरपूर बांध गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीची सुरक्षा भिंत तोडून थेट कार्यालयाच्या अंगणामध्ये घुसला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असून, ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे नुकसान झाले आहे. घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहे.